अहमदाबाद मधील मराठी कुटुंबातील हत्येचे गूढ उलगडले, 48 तासांत आरोपीला अटक

414 0

अहमदाबाद – अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून आरोपीला अवघ्या 48 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. विनोद याने आपली पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची चार दिवसांपूर्वी हत्या केल्याचा आरोप आहे. अहमदाबादच्या ओढव भागात दिव्यप्रभा सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंधी येत होती. सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी घरात डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं. स्थानिकांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून प्रवेश केला असता महिला, तिची आजी आणि 15 आणि 17 वर्षांची दोन मुलं यांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले.

हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या 48 तासांत अहमदाबाद क्राईम ब्रांचने महिलेचा पती विनोद गायकवाडला हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक केली आहे. हत्या करुन आधी तो अहमदाबादहून सुरत, तर तिथून इंदौरला पळून गेला होता. विनोद याने हत्येचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. मात्र कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जिवंत ठेवायचा नसल्याने त्याने कुटुंबातील चौघांचीही हत्या केल्याचं सांगितलं.

विनोद अहमदाबादच्या ओढव भागात टेम्पो चालवायचा. गेल्या काही काळापासून त्याची आर्थिक स्थिती बरी नव्हती. त्यावरुन विनोद आणि त्याच्या पत्नीत वाद होत असत. आजेसासूवर त्याने याआधीही हल्ला केला होता, मात्र नातीची अवस्था पाहून आजीने याविषयी तक्रार केली नाही.

Share This News
error: Content is protected !!