कोल्हापूर – लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्या वाचनात येणे ही नित्याची बाब झाली आहे. पण एका विकृत तरुणाने चक्क घोरपडी सोबत अनैसर्गिकपणे अत्याचार केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात ही घटना घडली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी मोबाइलमधून केलेल्या व्हिडिओ शुटिंगमुळे ही बाब उघड झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात तीन तरुण शिकारीसाठी हत्यारे घेऊन फिरत होते. त्यावेळी या तिघा तरुणांच्या हाती एक घोरपड लागली होती. या तीन तरुणांपैकी एकाने हे घृणास्पद कृत्य केले. व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या ट्रेप कॅमेऱ्यात 31 मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी दिसून आले. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे एका आरोपीला हातिव गावातून तर दोन आरोपींना संगमेश्वर तालुका येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींचे मोबाइल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडीसोबतच संभोग केल्याचा रेकॉर्डेड व्हिडीओ वनाधिकाऱ्यांच्या हाती लागला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची, यावर वन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. घोरपडी सोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याचा विचार करत आहे.