मुंबई- कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश येत असल्यामुळे 1 एप्रिलपासून राज्यातील कोविड निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे.
राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांशी लोकांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय संबंधित समितीने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
गुढीपाडवा, रामनवमी कशी साजरी करायची ?
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येतात. तर, रामनवमी निमित्तानेदेखील मिरवणुका निघतात. शोभायात्रांसाठी निर्बंध शिथील करण्याची मागणी करण्यात येत आहेत. त्याबाबतही नवीन सूचना येत्या एक-दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत.