मुंबई – रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी खोचक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. गुरूवारी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांना देताना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, ” राज्यातील परिस्थिती न पाहता तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात. राम आणि रावणच्या गोष्टीसारखी परिस्थिती आहे. रावणाचा जीव जसा बेंबीत होता त्याचप्रमाणे अनेकांना केंद्रात सत्ता मिळाली पण जीव मात्र मुंबईत आहे. आठ भाषांत शिक्षण देणारी एकमेव मुंबई महापालिका आहे. कोविड संदर्भात अनेक ठिकाणी कौतुक करण्यात आले”
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत केलेल्या कामांची जंत्री सादर केली. 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट दिली आहे. 139 प्रकारच्या मोफत तर काही नाममात्रं दरात चाचण्या करून देत आहोत. मुंबई मॉडल जगभरात प्रसिद्ध झाले आहे. कोविड बरा झाला पण ज्यांना द्वेषाची कावीळ झाली असेल तर काय करणार ? द्वेषाची कावीळ बरीच होऊ शकत नाही अशी टीका भाजपवर केली.
“पालिकेने कोविड काळात चांगलं काम केलं. कोविड काळात मोदींना पक्षभेद विसरून सर्वांना समान मदत केली. मी कबूल करेल. त्याबाबत मी कद्रूपण करत नाही. केंद्राने सेक्रेटरीचा गट तयार केला होता. त्यांनी पीपीई किट्स ऑक्सिजन दिले. ज्यावेळी गरज होती, त्यावेळी त्यांनी पुरवल्या. टेंडर काढली होती. वाटाघाटी करून किंमती ठरवल्या होत्या. कोणी तरी बुडत असेल आणि त्याला पोहता येत नसेल तर टायर आणि लाकूड देऊन वाचवणार की टायरचं टेंडर काढणार ?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
“कोरोना काळात शिवभोजन सुरू केलं. दहा रुपयात जेवण देतो हे मोठं काम आहे. आजपर्यंत 8 कोटीपेक्षा अधिका नागरिकांनी याचा लाभ घेतला, ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण त्यावर 500 कोटी तरतूद केली आहे. त्यावर लक्ष ठेवा नाही तर त्यातही भ्रष्टाचार दिसेल. काही झालं तरी भ्रष्टाचार झाला असे म्हणायचे आरसा बघितला तरी भ्रष्टाचार करतात. पण आरश्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना. पण त्यासाठी चेहरा तर आरशात पाहिला पाहिजे”
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं खूप मोठी चूक आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.