पुणे- रघुनाथ कुचिक प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेने खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे विशिष्ट जबाब नोंदवण्यास मला भाग पडले, असा दावा पीडित तरुणीने केला आहे.
शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तरुणीनं तक्रार दाखल केली होती. लग्नाच्या भूलथापा देऊन कुचिक यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसंच गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे. या प्रकरणातील पीडितेनं याबाबत साम टीव्हीवर धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं, असाही खळबळजनक आरोप तिने केला आहे.
चित्रा वाघ यांनी त्यानंतर अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन रघुनाथ कुचिक यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. या प्रकरणात चित्रा वाघ यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी शेवटी ‘दूध का दूध, पानी का पानी’ हे झालंच अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
शिवाजीनगर पोलिसांत रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तरूणीनं दिली होती तक्रार
कुचिक हे शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस
लग्नाच्या भूलथापा देऊन कुचिक यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा केला होता आरोप
गरोदर राहिल्याने तरूणीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही आरोप
जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही कुचिक यांच्यावर आरोप होता
६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप
आरोपानंतर कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल