नाशिक- अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे संजय राऊत यांनी निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप केला असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी परखड मत व्यक्त करत संजय राऊत यांना सल्ला दिला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ” संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठ्ठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे 166 पेक्षा जास्त आमदार होते. आम्ही नियोजनात चुकलो”
भाजपने दोन उमेदवारांना 48/ 48 मते दिली, पहिल्या फेरीनंतर ज्याला जास्त मतं आहेत, त्याची मत इतरांना ट्रासन्फर होतात. भाजपची मते ट्रान्स्फर झाली, आमची मते ट्रान्स्फर होण्याचा योगच आला नाही. संजय राऊत यांनाच अडचण निर्माण होते का?अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही 170 पेक्षा 180 मंतांची व्यवस्था करायला पाहिजे होते, यात कमी पडलो, असे भुजबळ म्हणाले.
त्यामुळे संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना आणखी दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करा, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला. भुजबळ म्हणाले, “पवार साहेबांचे मार्मिक स्टेटमेंट आले आहे, देवेंद्र फडणवीस अधिक लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले. याचा दुसरा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घेतला पाहिजे. अधिक लोक जवळ केली पाहिजेत”