समस्यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय बावधनचे कचरा‌ संकलन केंद्र सुरु करू नका- चंद्रकांत पाटील‌

367 0

पुणे- पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने रद्द केलेला कोथरुडमधील बावधन येथील कचरा‌ संकलन केंद्र सुरू करण्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे पूर्ण समाधान होत नाही; तोपर्यंत हा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.‌ तसेच नदीसुधार प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही हा प्रकल्प का रखडला असा सवाल पाटील यांनी आयुक्तांकडे उपस्थित केला.

कोथरूडसह पुण्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आज चंद्रकांत पाटील यांनी आज आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने बावधनमधील कचरा प्रकल्प, बालभारती-पौंड फाटा रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार, २३ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न, रामनदीचा समावेश असलेला नदी सुधार प्रकल्प, शहरातील प्रस्तावित उड्डाणपूलाचे नियोजन यांसह विविध विषयांचा समावेश होता.

या बैठकीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, सरचिटणीस दीपक पोटे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सेव्ह पुणे ट्रॉफिकचे हर्षद अभ्यंकर, कर्वे रस्ता व्यापारी संघटनेचे मंदार देसाई, नगरकर सराफ यांसह इतर मान्यवर आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!