बीड- बीड शहरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या इमारतीमधील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बीड शहरात एका ठिकाणी दोन इमारतींच्या मधल्या जागेवर बांधकाम सुरु होतं. यावेळी हादरे बसल्याने एक इमारत अक्षरशः एका बाजूने कलली. पत्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने त्वरित पालिका प्रशासनाला याची माहिती दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढले.
त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यादेखत ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. नागरिकांचा जीव वाचला पण त्यांचे घर होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील दोन ईमारतींच्या मधोमध रिकाम्या जागेवर बांधकाम सुरू होते. याच दरम्यान हादरा बसून एक चार मजली ईमारत कलली होती. आता ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं पत्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांना जाणवलं. त्यांनी ही माहिती तत्काळ बीड प्रशासनाला कळवली.
सदर इमारत अशा प्रकारे कोसळण्यासाठी कोण जबाबदार आहे, याचा तपास सध्या सुरु आहे. दोन इमारतींच्या मध्यभागी बांधकाम सुरु होतं. यावेळी बांधकामाच्या प्रक्रियेत चूक झाल्यामुळे आमची बिल्डिंग पडली, असा दावा येथील नागरिक करत आहेत. प्रशासकीय स्तरावर यासंबंधीची चौकशी होऊन प्रत्यक्ष दोषी कोण आहे, हे उघडकीस येईल.