पुणे- हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्या एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी भांडण झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या माजी सरपंच पुरुषोत्तम उर्फ आणा धारवाडकर यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्यांनी गोळी चुकवल्याने ते बालंबाल बचावले. मात्र आरोपींनी त्यांना दगड, विटांनी मारहाण केल्याने ते जबर जखमी झाले आहेत. ही घटना मांजरी मधील श्रीराम हॉटेलमध्ये घडली. सविस्तर बातमी थोड्याच वेळात…
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले आणि त्यांच्या ३ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काहीजणांबरोबर श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्याच टेबलावर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडण झाले. धारवाडकर यांचा त्या भांडणही काहीही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने आपल्या साथीदारांना त्या ठिकाणी बोलावले.
धारवाडकर जेवण करून हॉटेलबाहेर आले असता मोपेडवरून आलेल्या तिघांपैकी एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. धरवाडकर यांनी गोळी चुकवल्यामुळे ते थोडक्यात बचावले. मात्र त्यानंतर आरोपींनी त्याठिकाणी असलेले दगड, विटा उचलून धारवाडकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात धारवाडकर जबर जखमी झाले. कुणी वाचवायला आले तर त्यांची देखील अशीच अवस्था करू अशी धमकी देऊन ते तिघेजण पसार झाले.
धारवाडकर यांच्यावर हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या डोक्याला ८ टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. हडपसर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.