विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे यांना डावलले

385 0

मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या तीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचा पत्ता कट झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 9 जून हा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.

परळी मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात येणार का, याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र यावेळीही पंकजा यांना डावलण्यात आले. पंकजा मुंडे या विधानपरिषदेत जाण्यासाठी उत्सुक होत्या. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तसे संकेतही दिले होते. मला विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाल्यास, मी त्या संधीचं सोनं करेन, असेही पंकजा यांनी म्हटले होते.

देवेंद्र फडणवीस हे देखील पंकजा यांच्या विधानपरिषदेतील उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यसभेपाठोपाठ पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेत जाण्याची संधीही हुकली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करायची असते मात्र निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात येतो. पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्याबाबत केंद्राने भविष्यात काही विचार केला असावा. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मात्र, केंद्राच्या निर्णयाचं पालन करायला हवं. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. राजकारणात पूर्णविराम नसतो स्वल्पविराम असतो. घटक पक्षांना सुद्धा भाजपमध्ये योग्य स्थान मिळालं आहे. असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!