मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीनं स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालानुसार अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही असंही तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आर्यन खान याला दिलासा मिळाला आहे. मात्र एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या समोरील अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा एक भाग होता याचा कुठलाही पुरावा नाही. आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हतेच आणि त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे व्हॉट्सअप चॅट तपासण्याची गरज नव्हती. त्याच्या चॅट्सनुसार तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा एक भाग असल्याचा कुठलाही पुरवा नाहीये. एनसीबीने टाकलेल्या धाडीचा कुठलाही व्हिडीओ रेकॉर्ड केलेला नव्हता. तसेच गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज हे सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहे. असं या अहवालात म्हटले आहे.
या प्रकरणात एनसीबीने असं म्हटलं होतं की अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे.
काय आहे प्रकरण ?
2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीप्रकरणी एनसीबीनं टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ सापडल्यानं आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटसह इतर अनेक जणांना एनसीबीनं अटक केली होती. त्यानंतर 26 दिवसांनी आर्यन खान याला जामीन मिळाल्यावर आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, एसआयटीच्या अहवालानंतर एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा सुरू आहे.