अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, 13 मे पर्यंत कोठडीतच

356 0

मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुक्काम आणखी काही दिवस कोठडीतच असणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची म्हणजे 13 मे पर्यंत वाढ केली आहे. देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाही १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

१०० कोटींची खंडणी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे अटकेत असून सध्या त्यांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आलेला आहे. सीबीआय कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मागील वर्षी 2 नोव्हेेंबर रोजी 13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. सुरुवातीला देशमुखांची रवानगी सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मागील सुनावणीवेळी देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय कोर्टाने ही विनंती फेटाळली आणि देशमुखांना 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.

सध्या ते आर्थर रोड कारागृहात आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. देशमुख यांच्या कोठडीचा कालावधी आज संपुष्टात येणार होता. त्यामुळे आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयकडून देशमुखांच्या सीबीआय कोठडीत आणखी तीन दिवसांची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश डी.पी.शिंगाडे यांनी सीबीआयची ही मागणी फेटाळून लावत देशमुखांची आणखी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच प्रकरणात संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे हे अटकेत असून त्यांनाही १३ मेपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.

 

 

 

Share This News
error: Content is protected !!