पंढरपुरात दहावी पास बोगस डॉक्टरवर कारवाई

1448 0

राज्यात बोगस डॉक्टर आढळून येत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यात आता आणखी एका ताज्या घटनेची भर पडली आहे. केवळ दहावी पास आणि अवघ्या चार दिवसांचं ट्रेनिंग घेतलेल्या एका बोगस डॉक्टरचा कारनामा पंढरपुरातून समोर आला आहे.आरोग्य विभाग, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या मदतीने या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश कसा करण्यात आला ? पाहूयात.

कोणतीही पदवी किंवा वैद्यकीय शिक्षण न घेता एका बोगस महाराजाने जालन्यातून येऊन पंढरपुरात दवाखाना थाटला. शहरातील जुना अकलूज रस्ता येथील चंद्रभागा बस स्थानकामागे दवाखाना टाकून हे बोगस महाराज मधुमेह आणि हाडांच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करत होते. एका दिवसात अंदाजे 75 ते 80 रुग्ण उपचारासाठी यायचे. रुग्णांकडून पाचशे रुपये फी आकारली जायची. गेल्या तीन वर्षांपासून दत्तात्रय सदाशिव पवार हे शेगाव दुमाला आणि पंढरपूर या ठिकाणी रुग्णांवर उपचार करत होते. या बोगस डॉक्टरने त्यासाठी रुग्णांवर उपचार करण्याबाबत कोणतही अधिकृत शिक्षण घेतलेलं नव्हतं. तसेच इंडीयन मेडिकल कॉन्सील ॲक्ट 1956 आणि महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 चे सर्टीफिकेट नसल्यासचंही आढळून आलं. यासह सातारा येथील एका संस्थेत केवळ चार दिवस उपचार करण्याबाबत प्रशिक्षण घेतलं होतं. मात्र या डॉक्टर बाबत गेल्या काही महिन्यांपासून एक दहावी पास महाराज मधुमेह आणि हाडांच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या. यानंतर आरोग्य विभागाकडून पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाची मदत घेऊन या दवाखान्यावर धाड टाकण्यात आली. या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून दवाखाना आता बंद करण्यात आला आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी सध्या राज्यभर बोगस डॉक्टर पकडण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!