आज रामनवमीचा सण सर्वत्र उत्साहात सुरु असतानाच इंदूरच्या श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात विहिरीवरील छत तुटल्यामुळे दर्शनासाठी आलेले २५ भाविक विहिरीत कोसळले. यामध्ये १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर १० जणांना वाचवण्यात यश आले.
रामनवमीमुळे मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. मंदिरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीवरील छत तुटले. आणि त्यावर उभे असलेले भाविक विहिरीत कोसळले. या घटनेमुळे सर्वत्र हलकल्लोळ माजला. या घटनेत सुमारे २५ भाविक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. तत्पूर्वी विहिरीत पडलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. दहा भाविकांना विहिरीबाहेर काढण्यात यश आलं. मात्र १३ जणांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी, इंदूरचे आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा करुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. घटनास्थळी इंदूर पोलिसांचे उच्च अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारी उपस्थित आहेत.