ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही मेरीटच्या बेसवर शासनाच्या वसतिगृहांमध्ये हे विद्यार्थी प्रवेश मिळवतात. मात्र शासनाच्या वसतिगृहांमध्ये या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे अनेकदा समोर येत असते. त्यातच पुण्यातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये असलेल्या गैरसोयी आणि समस्यांमुळे दोन विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकणारा सिद्धांत खैरे आणि वेदांत सोनुने हे दोघे याच वसतिगृहात राहत होते. वसतिगृहाच्या परिसरात डासांचा हैदोस असल्यामुळे या दोघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर आत्ता वसतिगृहातील तक्रारी निवारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. वसतिगृहात स्वच्छता, औषध फवारणी, विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. यामुळे दोन तरुणांचा गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळेच या तरुणांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याचा विचार करून विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी काल 7 ऑगस्ट रोजी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली. पुण्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.