(Chandrashekhar Bawankule)

छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळासाठी वढू बुद्रुक येथे अडीच एकर जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

45 0

 

मुंबई, दि.२ जानेवारी :

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील जमीन आता समाधीस्थळसाठी उपलब्ध होणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा आज निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. या दोन्ही स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ५३२.५१ कोटी किमतीच्या विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

 

महसूल विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, के.ई.एम. रुग्णालयाची वढू बुद्रुक येथील गट नं. ४४७ आणि ४४८ मधील एकूण ०.८७ हेक्टर २० आर जमीन छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या कामासाठी तात्काळ हस्तांतरित केली जाणार आहे. या बदल्यात, शासनाने के.ई.एम. रुग्णालयाला कोंढापुरी (ता. शिरूर) येथील गट नं. ६५५ मधील ०.८१ आर जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणून कब्जा हक्काने प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. कोंढापुरी येथील जमीन रुग्णालयाला ‘विशेष बाब’ म्हणून महसूलमुक्त आणि भोगवटामूल्यरहित उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जमिनीचा वापर केवळ मंजूर वैद्यकीय प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असून तीन वर्षांच्या आत तिथे काम सुरू करावे लागेल.

 

” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा, ही सर्वांचीच अनेक वर्षांची मागणी होती. या निर्णयामुळे समाधीस्थळाच्या नियोजित विकास आराखड्याला मोठी गती मिळणार आहे. हे समाधीस्थळ त्याग व बलिदानाचे प्रतीक आहे.

• *चंद्रशेखर बावनकुळे*

महसूलमंत्री

 

•वढू बुद्रुक येथील नियोजित विकासकामे

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे अत्याधुनिक संग्रहालय आणि ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध ग्रंथालय उभारले जाणार आहे. ८२ आसन क्षमतेचे एक अत्याधुनिक सभागृह असेल, जिथे १०-डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रफित दाखवली जाईल. स्मारकाच्या परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण ‘अदृश्य शिल्प'(इन्व्हिझिबल स्कल्पचर) उभारले जाणार आहे. भीमा नदीच्या काठी १२० मीटर लांबीचा घाट बांधला जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!