Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

1309 0

बीडचा स्वयंघोषित ‘प्रति पालकमंत्री’ बनून पोलीस-प्रशासनाला आपल्या धाकाच्या टाचेखाली ठेवणारा वाल्या म्हणजेच वाल्मीक कराड. खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला हा आरोपी काल मंगळवारी पुण्यात सीआयडी पोलिसांसमोर शरण आला आणि 14 दिवसांकरिता बिन भाड्याच्या खोलीत जाऊन बसला. खंडणी, हाणामारी, निवडणुकीतील गैरप्रकार असे गंभीर गुन्हे दाखल असताना बालही बांका न झालेला

हा वाल्मीक अण्णा आहे तरी कोण? कलियुगातल्या या वाल्याला ही दहशत पसरवण्याची ऊर्जा मिळाली तरी कुठून?… ‘राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

‘थर्मल पॉवर’ची राख, परळी बेचि’राख’!

‘राख’… परळीची राख! परळीतल्या थर्मल पॉवर प्लांटमधून बाहेर टाकली जाणारी राखच या वाल्मीक कराडची आर्थिक ताकद बनली आणि लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हीच राख त्याची ऊर्जा बनली. राखेतून पैसा, पैशातून दहशत आणि दहशतीतून गुन्हा असे मजले रचत रचत या वाल्मीक कराडनं ‘राखे’च्या ढिगाऱ्यावर आपल्या गुन्हेगारीचा डोलारा उभा केला. या वाल्मीक अण्णाची दहशतच इतकी, की ‘अण्णांना फोन करायला सांगू का?’,असं जरी कुणी एखाद्या अधिकाऱ्याला म्हटलं तरी ते काम त्या संबंधित अधिकाऱ्याकडून झालंच म्हणून समजा! अर्थात, या दहशतीला खतपाणी घालण्यासाठी जशी अर्थकारणाची गरज भासते तशीच त्याला राजकारणाचीही जोड लागते. राखेच्या ढिगाऱ्यावर उभा राहून गुन्ह्यांचे ढिगारे रचणारा हाच वाल्मीक कराड पुढं जाऊन ‘राख’माफिया बनला. या राखेतूनच त्याच्या गुन्ह्यांची मालिका सुरू झाली. खंडणी, हाणामारी, निवडणुकीतील गैरप्रकार आदी कैक गुन्हे करूनही तो आतापर्यंत नामनिराळा का राहू शकला याचं उत्तर म्हणजे त्याला लाभलेला राजकीय वरदहस्त!

सारं काही घडतंय ज्याच्यामुळं, वडगाव दादाहरीतलं ‘राखे’चं तळं!

परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून (Thermal Power Plant) निघणाऱ्या राखेनं परळीकरांचं आरोग्य तर धोक्यात आणलंच पण परळीसह बीड जिल्ह्यातल्या अनेकांच्या मनात लोभ जागा करून त्यांना पैशाची चटकही लावली. यातूनच पुढं खंडणी, खून, हाणामारी या घटनांनी थैमान घातलं. Thermal Power Plant मधून बाहेर पडणाऱ्या या राखेचं पुढं होतं तरी काय? परळी येथे 1971 मध्ये औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती झाली. वीजनिर्मितीसाठी आवश्यक असतो तो कोळसा. सुरूवातीला हा कोळसा जळाल्यानंतर त्याची झालेली राख टाकायची तरी कुठं हा प्रश्न निर्माण झाला. अखेर या प्रकल्पापासून सुमारे 7 ते 8 किलोमीटरवर असलेल्या वडगाव दादाहरीमधील एका तळ्यात ही राख टाकायला सुरूवात झाली आणि हे तळं नंतर राखेचं तळं बनलं. सुरूवातीला फुकट राख घेऊन जा, असं म्हटलं तरी देखील ही राख घेऊन जायला कुणी तयार होत नव्हतं. मात्र काही काळानंतर या परिसरात वीटभट्टयांनी आपलं बस्तान बसवलं आणि फुकटातही कुणी घेऊन जात नसलेल्या या राखेला सोन्याचा भाव आला. सुरूवातीला ही राख उचलताना 200 रूपये हायवा असा भाव नंतर 8000 रूपये हायवा इथपर्यंत जाऊन पोचला. हायवा गाडीत भरून उचलली जाणारी ही राख परिसरातील वीटभट्टयांना पुरवली जाऊ लागली. भाजक्या विटा बनवण्यासाठी या राखेची मागणी वाढू लागली. या विटा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ लागल्या आणि या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली. सिमेंट कंपन्यांना देखील या राखेचा पुरवठा होऊ लागला. या राखेच्या तळ्यातून तब्बल 300 ते 400 पोकलेन रोज-दररोज राख उपसू लागले. राखेचे ढीगच्या ढीग रचू लागले. जेसीबीच्या साह्यानं हजार-दीड हजार हायवा राख भरून पाठवले जाऊ लागले. या व्यवहारातून वर्षाला एक हजार कोटींची उलाढाल होत असल्याचं अभ्यासक सांगू लागले. परळीची आर्थिक सुबत्ता असलेली ही राख फक्त आपल्याच ताब्यात राहावी यासाठी मग राजकीय दादागिरी सुरू झाली. वीटभट्टीचालक, पोकलेन, जेसीबी, हायवा मालक, छोटे-मोठे व्यावसायिक, ठेकेदार, कामगार या सर्वांवर ताबा मिळवण्यासाठी गुंडपुंडांची गरज भासू लागली आणि पुढं याच राखेनं जन्माला घातला राखमाफिया! या ‘थर्मल पॉवर’च्या राखेतून जन्माला आलेल्या दहशतीनं परळी मात्र बेचि’राख’ झाली.

वाल्मीकच्या हाती गंडे-दोरे, कुठवर पोचणार धागेदोरे?

हातात गंडे-दोरे, गळ्यात गमछा, चालण्यात रूबाब आणि बोलण्यात धाक असा आजपर्यंतचा वावर असलेला वाल्मीक कराड मोठ्या थाटात बड्या गाडीतून पुण्यातील सीआयडी ऑफिसला पोचला. ऐटीत गाडीतून उतरला आणि पोलिसांना शरणही गेला. हा रूबाब, हा थाट हा धाक या वाल्मीक कराडकडं आला तरी कुठून? पाहूयात… वाल्मीकच्या हाती गंडे-दोरे, कुठवर पोचणार धागेदोरे?

बीडचा ‘प्रति पालकमंत्री’ कोण? वाल्मीक कराड!

वाल्मीक कराड हा तसा गोपीनाथ मुंडेंचा कार्यकर्ता. पुढं त्यानं त्याचा धनी बदलला आणि तो धनंजय मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. वैद्यनाथ महाविद्यालयात शिकत असताना त्याच्या शर्टाची मागील बाजू एका फोटोनं व्यापलेली असायची आणि तो फोटो म्हणजे फेटा घातलेले गोपीनाथ मुंडे! हाणामारीचे कारनामे त्यानं काही काल परवापासून सुरू केलेले नाहीत. कॉलेजच्या निवडणुकांमध्ये त्यानं केलेल्या त्याच्या हाणामारीचे किस्से आजही सांगितले जातात. गोळीबाराच्या एका घटनेत तो जखमीही झाला होता म्हणे! पुढं मुंडे यांच्या हयातीत त्याच पाऊल राजकारणात पडलं आणि तो परळीतून नगरसेवक म्हणून निवडून गेला. काही काळ त्यानं परळी नगराध्यक्षपदाचा प्रभारही सांभाळला. कालांतरानं धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे या काका-पुतण्यात दरार पडली आणि त्यानं काकाला सोडून पुतण्याची साथ धरली. परळीची नगरपालिका धनंजय मुंडेंच्या ताब्यात येताच वाल्मीक कराडनं पालिकेच्या कारभाराचा ताबा घेतला आणि उपनगराध्यक्ष, गटनेताही बनला. धनंजय मुंडे हे परळीबाहेर पडले रे पडले की बीडचा ‘प्रति पालकमंत्री’ कोण बनायचा? एकच नाव वाल्मीक कराड!

वाल्मीक कराड तर ‘आत’ गेला आता पुढचा नंबर कुणाचा?

खंडणी, हाणामारी, बेकायदा जमावाची जमवाजमव आदी गुन्ह्यांची जंत्री या प्रति पालकमंत्र्यावर दाखल असताना मस्साजोग येथील एका पवनऊर्जा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आणि त्याचा सारा कच्चाचिठ्ठा बाहेर आला. आता याच खंडणीच्या गुन्ह्यात तो जरी आत असला तरी त्याच्या आतून आता कुणाकुणाची नावं बाहेर पडणार यावर आत जाण्याचा पुढचा नंबर कुणाचा हे सारं अवलंबून असेल. थोडक्यात, राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो, हे ऐकलं होतं पण ‘राखे’तून गुन्हे करायलाही उभारी मिळते हे प्रत्यक्षात पाहायला मिळालं. राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

Share This News
error: Content is protected !!