पुणे :हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या मयूरपंख रथामधून निघणार आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल.
आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा होईल. त्यानंतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाडा येथून बाप्पाचा ‘मयुरपंखी रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर रात्री आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक विद्युत रोषणाईने मयूरपंख रथ सजविण्यात आला असून या रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके जोरदार वादन करणार आहेत.
श्रीराम, शिवमुद्रा आणि समर्थ या ढोल ताशा पथकांबरोबरच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहेत. ” वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही बालन यांनी सांगितले.
‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’ असं आवाहन उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केला आहे.