काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश झाला. कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष असलेल्या सुधीर काळे यांचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, राजेश येनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सुधीर काळे हे उशिरा भाजपमध्ये दाखल झाले असले तरी ते भाजपमध्ये यावेत अशी आमची कायम इच्छा होती. निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, याचा आम्हाला अभिमान आहे. प्रतिकूल परिस्थितीत विचाराशी बांधिलकी ठेवून काम करणारे कार्यकर्ते आणि नेते आमच्यासोबत येत असल्याने पक्षाचा उत्साह अधिक वाढला आहे. सुधीर काळे यांचा दीर्घ राजकीय अनुभव आणि सर्वसमावेशक कामाची प्रतिमा भाजपसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, सुधीर काळे यांचे राजकारणातील योगदान आणि अनुभव लक्षात घेता त्यांचा पक्षात योग्य सन्मान राखला जाईल. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला पुण्यातून मोठे बळ मिळेल. प्रभाग क्रमांक २७ मधील विजयात सुधीर काळे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुधीर काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आजपासून मी भाजपचा एक निष्ठावान घटक झालो आहे. काँग्रेसमध्ये ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले, त्याच पद्धतीने भाजपमध्येही काम करेन. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या कार्याने प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.