पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना अनेकदा आपल्या चुकीमुळे इतरांचे जीव धोक्यात घालणारे वाहन चालक आपल्याच चुकीमुळे स्वतःचा जीव देखील धोक्यात घालताना दिसून येतात. अशीच एक घटना पुण्यातील कात्रज भागात घडली. भरधाव वेगात दुचाकी चालवत निघालेल्या तरुणाचा वीजेच्या खांबाला धडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कात्रज- कोंढवा पुलावर आज दुपारच्या सुमारास घडली.
नीनाद प्रेमकुमार तळेकर (वय २५, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नीनाद हा दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरुन कात्रज-कोंढवा रस्त्याने चालला होता. त्याने स्वतः हेल्मेट घातलेले नव्हते तर दुचाकी देखील भरधाव वेगात चालवत होता. वेगात असलेली दुचाकी त्याला नियंत्रणात ठेवता न आल्याने त्याने सुरवातीला पायी जाणाऱ्या एका मुलाला धडक दिली, ज्यामुळे या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला. नंतर स्वतःच विजेच्या खांबाला जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की जोरात खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.