अभिनेता रितेश देशमुख (RITESH DESHMUKH)आणि आमदार धीरज देशमुख (DHIRAJ DESHMUKH) यांनी सोशल मीडियावर ( SOCIAL MEDIA) शेअर केलेल्या एका जुन्या व्हिडिओमुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (VILASRAO DESHMUKH) यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचा निर्णय पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडिओत त्यांनी शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (VILASRAO DESHMUKH) यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यात शिवजयंती साजरी करण्यास एकसंध दिशा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत अनेक वर्षे मतभेद आणि वेगवेगळ्या तारखांची मते समोर येत होती, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन देशमुख यांनी विषय गांभीर्याने हाताळला. त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत असलेले दिवंगत रामकृष्ण मोरे (RAMKRUSHNA MORE) यांच्या सहकार्याने या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. अखेर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित करण्यात आली आणि त्या दिवशी जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले.
शिवजयंतीच्या( SHIVAJAYANTI) पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, राज्यभरात त्या ऐतिहासिक निर्णयाची पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे.