नाशिक- पबजी (PUBG) या खेळाच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पबजी खेळता खेळता एक 12 वर्षांचा मुलगा थेट नांदेडहून नाशिकरोड येथे पोहोचला.
नागेश माधवराव जाहुरे असे या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो बिलोरी तालुक्यातील हरनाळा येथील रहिवासी आहे.
नागेश हा बुधवारी सकाळी अंगणात मोबाइलवर पबजी खेळत होता. खेळता खेळता तो नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचला. तिथे तो थेट रेल्वेत बसला. गेममध्ये स्पर्धा वाढत गेल्याने तो त्या खेळात इतका रममाण झाला की आपण कुठे चाललोय याचे त्याला भानच नव्हते. रेल्वे जशी वेगाने पुढे जात होती त्यानुसार तोही आपल्या घरापासून दूर जात होता.
दुसरीकडे नागेशच्या घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तो सापडला नाही. म्हणून त्याच्या घरच्यांनी नागेश हरविल्याची तक्रार दिली. त्याचा फोटो पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर नाशिकरोड पोलिसांना तपोवन एक्सप्रेसमध्ये नागेश आढळला. मात्र, यावेळी तो प्रचंड भेदरला होता. त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. तर काही तासांनी त्यांनी माहिती दिली आणि मग पोलिसांनी नागेशच्या घरच्यांना त्याच्याबाबत कळवले. यानंतर त्याच्या घरच्यांनी नाशिकरोड गाठले आणि नागेशला ताब्यात घेतले. तब्बल 24 तासांनी मिळाल्यानंतर घरच्यांचा जीव भांड्यात पडला.
नागेश हा त्याच्या आजोबांचा लाडका आहे. यामुळे त्याला मोबाइलपासून वापरण्यापासून कुणी थांबवत नव्हते. त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून आम्हाला आमचा मुलगा सापडला. आमचा मुलगा हरवला असता तर मोबाइल आणि पबजी काय भावात पडले असते? अशी प्रतिक्रिया नागेशचे वडील माधवराव जाहुरे यांनी दिली आहे.