सनातन संस्थेवर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयातून निकाली
मुंबई – सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ ठरवून तिच्यावर बंदी घालण्यासाठी वर्ष २०११ मध्ये दाखल करण्यात आलेली जनहित याचिका अखेर मागे घेण्याची नामुष्की याचिकाकर्त्यांवर ओढवली. तब्बल १४ वर्षे चाललेल्या या न्यायालयीन संघर्षात, याचिकाकर्त्यांना संस्थेच्या विरोधात दहशतवादाचा एकही पुरावा सादर करता आला नाही. ‘‘याचिकेची सुनावणी घेण्यासाठी कोणताही आधार नाही. तुम्ही याचिका मागे घेता कि आम्ही ती फेटाळून लावू?’’, अशा कठोर शब्दांत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर याचिकाकर्त्यांना आपली याचिका बिनशर्त मागे घेतली. हा केवळ सनातन संस्थेचा विजय नसून, सत्य, न्याय आणि धर्मनिष्ठा यांचा विजय आहे. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा होती, ती आज पुन्हा एकदा सत्यात उतरली. सर्वशक्तीमान भगवंत, न्यायदेवता, आमचे गुरु आणि या प्रकरणात आमच्या बाजूने लढणारे अधिवक्ते यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी या निकालानंतर म्हटले आहे.
सनातन संस्थेच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, तसेच ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा, अधिवक्ता अलौकीक पै आणि अधिवक्ता वसंत बनसोडे यांनी बाजू मांडली. गेल्या दीड दशकापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या ‘इकोसिस्टम’ने सनातन संस्थेला लक्ष्य करून ‘भगवा आतंकवादा’चा खोटा नॅरेटिव्ह रचला. वर्ष २००८ ते २०२५ या काळात सनातन संस्थेची झालेली अपरिमित हानी आणि हजारो निष्पाप साधकांना सोसावा लागलेला प्रचंड मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार? या संपूर्ण काळात सनातन संस्थेने भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण संयमाने सर्व तपास यंत्रणांना सहकार्य केले. देशातील सर्वात मोठी राष्ट्रवादी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ज्याप्रमाणे खोटे आरोप करून बंदी घालण्यात आली, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा हा प्रयत्न होता, जो न्यायदेवतेने हाणून पाडला आहे, असेही वर्तक म्हणाले.
सनातन संस्थेला आतंकवादी ठरवून तिच्यावर बंदी घालावी, अशी मागणी सर्वप्रथम वर्ष २००८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केली, त्यानंतर काँग्रेसने ‘हिंदु दहशतवाद’ हा शब्द प्रचलित करण्यासाठी आटापिटा केला; मात्र प्रत्येक वेळी सनातन संस्था निर्दोष सिद्ध झाली. वर्ष २००८ च्या गडकरी रंगायतन स्फोट प्रकरणात सनातनला सर्वप्रथम गोवले; परंतु न्यायालयात सनातन संस्था निर्दोष ठरली. पुढे वर्ष २००९ मध्ये गोव्यात मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही काँग्रेस सरकारने सनातनला गोवले; या प्रकरणीही विशेष सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये सनातनचे निर्दोषत्व सिद्ध करत तपासयंत्रणांवर ताशेरेही ओढले. वर्ष २०१३ मध्ये डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातही सनातनला लक्ष्य करून अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तोही पुढे निष्फळ ठरला. हे सर्व खटले म्हणजे ‘हिंदु दहशतवाद’ सिद्ध करून सनातन संस्थेला संपवण्याच्या मोठ्या कटाचा भाग होता.
ईश्वराचे कार्य करणाऱ्या संघटनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काळाने (ईश्वराने) योग्य उत्तर दिले आहे. या कठीण काळातही सनातन संस्थेचे राष्ट्र, धर्म आणि समाजहिताचे कार्य अविरतपणे वाढतच असून नुकतेच सनातनने रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले. न्यायालयाने सनातनला निर्दोष मुक्त केले आहे; मात्र सनातन धर्मविरोधी प्रवृत्तींच्या विरोधातील अर्थात् या ‘इकोसिस्टम’च्या विरोधातील लढा अद्याप संपला नाही. हा लढा लढण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होण्याची गरज आहे, असेही श्री. अभय वर्तक म्हणाले.