विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं वादळ राज्यभरात आलं आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी, बंडखोरी केल्याचं बघायला मिळालं. वरिष्ठ नेत्यांकडून बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र तरीही अनेक बंडखोरांचं बंड थंड करण्याचे प्रयत्न अपयशी झाले. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आणि बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही कारवाई केल्याची अधिकृत माहिती परिपत्रक जारी करून जाहीर केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीतील तब्बल 8 नेत्यांना पक्षातून निलंबित केलं आहे.
निलंबित 8 नेते कोण ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा पुजा व्यवहारे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर, दहिसर तालुकाध्यक्षा ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्वांना निलंबित केलं आहे.
तटकरे म्हणाले…
या निलंबनाच्या कारवाईवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘ज्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरून पक्षविरोधी भूमिका घेतलेली आहे. तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे कृत्य जाणीवपूर्वक करून पक्षशिस्तभंग केल्यामुळे या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून निलंबित करण्यात आलं आहे.’ असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.