पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असून, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे की, बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या रस्त्याचे तातडीने क्राँक्रिटीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी त्यांनी आजपासून भर उन्हात अन्नत्याग करत उपोषण सुरू केले आहे. “जोपर्यंत कामाचे वर्क ऑर्डर निघत नाही, तोपर्यंत मी अन्न खाणार नाही,” असा ठाम निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
या रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, भाविक आणि स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी ४ मार्च रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पीएमआरडीएच्या आयुक्तांनी ३ मार्च रोजी रस्ता दुरुस्तीचा शब्द दिला होता. मात्र, महिन्याभरानंतरही कोणतीही कृती न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.
या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शवत मंदिरात जलाभिषेक व विशेष पूजन करून प्रशासनाला जाग यावी, अशी प्रार्थना केली. प्रशांत जगताप यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र दुडी यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप केला आहे.
आता खासदार सुळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.