JALGAON NEWS : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात माजी नगरसेवकावर झालेल्या कोयत्याच्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर तिघा तरुणांनी जीवघेणा हल्ला चढवला होता. वारंवार कोयत्याचे प्रहार झाल्याने चौधरी गंभीर जखमी झाले (JALGAON NEWS) असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांची शिताफी, तिघे आरोपी जेरबंद
घटनेचा तपास सुरू करून पोलिसांनी केवळ काही दिवसांत आरोपींना जेरबंद केले. सोमा उर्फ सागर चौधरी, हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी या तिघांना चाळीसगाव शहरातूनच अटक करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दहशत कमी करण्यासाठी आरोपींची धिंड
हल्ल्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. ही दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी तिन्ही आरोपींची धिंड काढत त्यांना नागरिकांसमोर आणले. यानंतर शहरवासीयांनी पोलिसांच्या पावलाचं स्वागत केलं. आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पुढील तपासात हल्ल्यामागील कारण आणि इतरांचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे.