सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर सध्या गुन्हेगारीचे माहेरघर बनले आहे. एका बाजूला गुन्हे रोखण्यासाठी पोलीस विविध उपाय योजना करत आहेत. पोलीस आयुक्त देखील ॲक्शन मोड मध्ये आहेत तर दुसरीकडे शुल्लक कारणांवरून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण पुण्यात वाढ होत आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली. हॉटेल बंद करून निघालेल्या हॉटेल मालकाला पिझ्झा मागितला मात्र हॉटेल बंद केल्याने मालकाने पिझ्झा द्यायला नकार दिला. यामुळे हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यातील खराडी भागामध्ये रात्री दीड वाजता हा प्रकार घडला. या भागात असलेल्या एका हॉटेलचा मालक आपलं काम संपवून हॉटेल बंद करून निघाला होता. त्याचवेळी तिथे अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव नावाचे तरुण पोहोचले. त्यांनी हॉटेल मालकाकडे पिझ्झाची मागणी केली. मात्र हॉटेल बंद केल्यामुळे मालकाने पिझ्झा द्यायला स्पष्ट नकार दिला. या चौघांनी पिझ्झाची मागणी लावून धरली, मात्र मालकाने त्यांना पिझ्झा दिला नाही. याचाच राग मनात धरून या चौघांनी हॉटेल मालकाला बेदम मारहाण केली. आरोपींनी लाथा, बुक्क्यां बरोबरच दगडाने देखील हॉटेल मालकाला मारले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. पीडित तरुणाने तात्काळ पोलिसात धाव घेत या चारही आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.