HISTORY OF BABA BHIDE BRIDGE PUNE : मागच्या तीन महिन्यांपासून बंद असलेला बाबा भिडे पूल अखेर येथे 20 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणारये. पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या पुलाचा नेमका इतिहास काय? कोण होते बाबा भिडे? चला डोकावून पाहूया इतिहासात…
पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली….! पावसाळ्याच्या दिवसांत अशी वाक्य आवर्जून तुमच्या कानावर पडली असतील. डेक्कन पासून पुण्यातल्या पेठांना जोडणारा हा पूल.. या पुलावरून 4 चाकी वाहनांना (HISTORY OF BABA BHIDE BRIDGE PUNE) बंदी असली तरी दुचाकी वाहनचालकांसाठी हा पसंतीचा मार्ग आहे. मागच्या तीन महिन्यांपासून हा पूल बंद करण्यात आला होता. मात्र अखेर हा पूल 20 ऑगस्ट पर्यंत खुला होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
SATARA NEWS : साताऱ्यात शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; अशा विकृतींचं करायचं काय ?
पुण्यातला भिडे पूल म्हणजे पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय… पुण्यात केवळ चार दिवस मुसळधार पाऊस झाला तर अवघ्या दीड TMC पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या खडकवासला धरणा मधून पाण्याचा विसर्ग मुठा नदीत केला जातो. आणि इकडे लगेच पुण्यात भिडे पूल पाण्याखाली जातो. आता नेहमी चर्चेत असणाऱ्या या पुलाला भिडे पूल असं नाव कसं? पडलं? बाबा भिडे नेमके कोण? चला या पुलाच्या इतिहासत डोकावून पाहूया…
*TOP NEWS MARATHI : अखेर बाबा भिडे पूल खुला होणार… भिडे पुलाचा नेमका इतिहास काय? कोण होते बाबा भिडे?
भिडे पूल हे ज्यांच्या नावावरून दिले गेले होते ते बाबा भिडे… बळवंत नारायण भिडे असं त्यांचं पूर्ण नाव… बाबाराव भिडे साताऱ्यातील माण तालुक्यातील सबनीसवाडीचे! त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1904 ला झाला. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला… भिडेंनी प्राथमिक शिक्षण साताऱ्यात घेतलं त्यानंतर 1920 मध्ये भिडे कुटुंब पुण्यात आलं. त्यानंतर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधून 1923 मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. 1927 मध्ये सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली आणि 1929 साली LLB ची पदवी घेऊन त्यांनी आपल्या वकिलीच्या कारकीर्दीला प्रारंभ केला.
सुरुवातीच्या काळात बाबाराव भिडे खडकी कोर्टात वकिली करायचे. फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकारची काम करायचे त्याच्या पुढच्या काळात वकिलीत जम बसून त्यांनी फक्त फौजदारी कामं नाहीत तर त्यांनी अख्ख पुणे गाजवलं… पुण्याच्या इतिहासात फौजदारी वकिलीत त्यांचं स्थान वरचं होतं. पुणे बार असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा होते वकिली म्हणजे समाजसेवा असं त्यांचं धोरण…
पुण्यातल्या पुलाला भिडे पूल हे नाव कसं पडलं?
1938 साली सर संघ चालक डॉ. हेगडेवार पुण्यात आले होते तेव्हा बाबाराव भिडे यांचा पहिल्यांदा संघाशी संबंध आला. हवेली तालुका संघ चालक म्हणून भिडेंनी 1938 ते 1942 मध्ये काम पाहिलं. तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचे जीवन हे संघरुपच राहीलं. 1967 साली त्यांना महाराष्ट्र प्रांत संघचालक पदाची सूत्र मिळाली. भिडेंना पुण्याच्या सार्वजनिक जीवनात मानाचं स्थान प्राप्त झालं होतं. स्वतःची जमीन त्यांनी नाममात्र रुपयात शिक्षण संस्थांना दिली होती. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांशी सुद्धा त्यांचा संबंध आला. अनेक ठिकाणी त्यांनी अध्यक्षपदं भूषवली… त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र दरारा होता. लोकमान्य टिळकांना ते आदर्श माणायचे, आणीबाणीच्या काळात त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला होता. 9 मे 1983 रोजी वयाच्या 79 व्या वर्षी नाशिकमध्ये त्यांचं निधन झालं. अशा या कैलासवासी एडवोकेट बाबाराव भिडे यांचे नाव महापालिकेने पुण्यातल्या डेक्कन जिमखाना ते केळकर रस्त्याला जोडणाऱ्या मुठा नदीवरच्या पुलाला दिलं. आणि 24 जून 2000 साली या पुलाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या पुलाची लांबी 88 मीटर असून त्याच्या बांधकामास 81 लाख रुपये खर्च आला होता.
ही झाली भिडे पुलाची गोष्ट ! भिडे पूल स्थापना झाल्यापासून त्याने अनेक आठवणी पुणेकरांसोबत साठवून ठेवल्यात मग. भिडे पूल पाण्याखाली गेल्यावर पूर बघ्यांची गर्दी असो किंवा पत्रकारांनी या पुलावरून केलेलं वार्तांकन… आगामी गणेशोत्सव लक्षात घेता भिडे पुलावरील वाहतूक पुणेकरांना सोयीची ठरणार आहे हे नक्की.