मुंबई : कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता ? हे विचारायला
दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का? असा वादग्रस्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला, असे काही पर्यटक सांगत आहेत. तर काहींनी असे घडले नसल्याचे म्हटले आहे. मुळात दहशतवाद्याला धर्म किंवा कुठलीही जात नसते. या हल्ल्याबाबत सरकारकडून काही प्रतिक्रिया दिली जात नाही, सरकारचे हे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.
नेहमी भारत-पाकिस्तान असा जप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. पर्यटक असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? २०० किलोमीटरपर्यंत दहशतवादी कसे आले? तुमच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? सुरक्षेत चूक कशी झाली? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.