साताऱ्यातील धीरज ढाणे नावाच्या व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्या प्रकरणी इचलकरंजीतील जर्मनी गॅंगच्या सातारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याच जर्मनी गॅंगने इचलकरंजीतही धुमाकूळ घातलाय. त्यानंतर आता साताऱ्यातही ही गॅंग गुन्हे करण्यात ऍक्टिव्ह होताना दिसत होती. मात्र आता या गॅंग मधील तब्बल सात जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय.
सातारा पोलिसांनी दरोडाच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला आहे. काही दिवसांपूर्वी वैयक्तिक वादातून धीरज ढाणे या व्यक्तीला मारण्याची सुपारी देण्यात आली होती. आरोपी पोलिसांना सापडू नयेत यासाठी साताऱ्यातील गुन्हेगारांना सुपारी न देता चक्क इचलकरंजी मधील कुख्यात जर्मनी गॅंगच्या गुन्हेगारांना ही सुपारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे खूनाच्या गटातील मुख्य सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा असल्याचं उघड झालंय. निलेशने धीरजला मारण्यासाठी तब्बल 20 लाखांची सुपारी दिली होती. दरम्यान या प्रकरणात आता इचलकरंजी आणि साताऱ्यातून एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 पिस्तूल, कोयता, जिवंत काडतुसे असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.