NAGPUR :अर्ज मागे घेण्यावरून गोंधळ ….नागपुरात समर्थकांनी उमेदवारालाच कोंडलं

38 0

नागपूर  (NAGPUR) महापालिका निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरणारी घटना समोर आली आहे. प्रभाग १३ ड मधील अपक्ष उमेदवार किसन गावडे(KISAN GAWADE) हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बाहेर पडत असताना, त्यांच्या समर्थकांनीच त्यांना घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या(BJP) निर्देशानुसार किसन गावडे(KISAN GAWADE) उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा होती. मात्र हे कळताच त्यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवला. “उमेदवारी अर्ज मागे घेऊ नका, आम्हाला तुम्हीच उमेदवार हवेत,” अशी भूमिका घेत समर्थकांनी गावडे यांच्या घराला बाहेरून कुलूप लावले आणि त्यांना बाहेर जाण्यापासून रोखले.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, अवघ्या १३ दिवसांत मतदान आणि त्यानंतर लगेचच निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली असून आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंडखोरी, नाराजी आणि राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत.

मात्र नागपुरातील हा प्रकार वेगळाच ठरला. उमेदवारी न मिळाल्याने नाराजी नव्हे, तर उमेदवारी कायम ठेवण्यासाठी समर्थकांनी थेट टोकाची भूमिका घेतल्याचे चित्र दिसले. काही काळ हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता आणि या घटनेने शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

Share This News
error: Content is protected !!