BJP MLC CANDIDATE27 मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, राजेश कराड हे भाजपाचे विधान परिषदेचे तीन आमदार विधानसभेवर निर्वाचित झाल्याने या
जागा रिक्त झाल्या होत्या. या जागांवर दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजुरकर, माधव भंडारी यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती
मात्र अखेरच्या क्षणी या तीन नावांना संधी दिली आहे.
विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले दादाराव केचे हे आर्वी विधानसभेचे माजी आमदार
असून 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दादाराव केचे यांचा पत्ता कट करून देवेंद्र फडणवीस यांचे
ओएसडी राहिलेले सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आले होते. त्यानंतर आता दादाराव केच यांचं राजकीय पुनर्वसन झालं आहे.
तर संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर असून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
संजय केनेकर हे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्यांक
मोर्चाचे प्रभारी असून प्रदेश सरचिटणीस अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे.