ANMOL KEWTE: गाडीला कट लागल्याच्या रागातून अमोल केवटेला संपवलं; सोनाली भोसलेवर वार

ANMOL KEWTE: गाडीला कट लागल्याच्या रागातून अमोल केवटेला संपवलं; सोनाली भोसलेवर वार

64 0

गाडीला कट मारण्यावरून झालेल्या वादात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आला. तर त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवरही वार करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अनमोल केवटे (anmol kewte) असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तो मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप गावचा रहिवासी होता.

तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता. मात्र तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं सांगायचा. शरद पवार, रोहित पवार यांच्याबरोबरचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटला आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या केवटे यांच्या मैत्रिणीचं नाव सोनाली भोसले असं आहे. जखमी सोनाली भोसले या अंत्रोली, जि. सोलापूरच्या रहिवासी असून विवाहित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. त्या देखील समितीत कार्यरत आहेत. अनमोल आणि सोनाली लातूर मेळाव्यासाठी आल्या होत्या. तिथली बैठक संपवून जेवण करून दोघेही कारनं सोलापूरला निघाले. अनमोल यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. खाडगाव रोडवर साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांच्या कारला एका क्रुझर जीपने ओव्हरटेक करताना कट दिला. एवढ्यावर न थांबता जीपच्या ड्रायव्हरने कार समोर जीप आडवी लावली. खाली उतरून केवटे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. सोनाली यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे काही कळायच्या आत वाद चिघळला आणि हल्लेखोरांनी धारदार चाकूंनी केवटे यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी अनमोलवर तुटून पडत गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार केले. त्यामुळे अनमोल जागीच कोसळला. त्यानंतर सोनाली भोसले यांच्याही छातीवर तीन आणि पाठीवर दोन वार झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. हल्यानंतर आरोपी पसार झाले. तर अनमोलचा चालक नवनाथ धाकपाडे यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. क्रुझर जीपचा मालक विष्णू मामडगे, मंथन मामडगे, शुभम पतंगे आणि वैभव स्वामी अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी तात्काळ शुभम पतंगे आणि वैभव स्वामीला अटक केली असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र मुख्य आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे फरार आहेत.

पथकं रवाना

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूर पोलिसांनी पाच विशेष पथकं तयार केली आहेत. विष्णू मामडगे आणि मंथन मामडगे यांचा शोध घेण्यासाठी ही पथक रवाना झाली आहेत. दरम्यान या प्रकरणातील मुख्य प्रत्यक्षदर्शी असलेल्या अनमोल यांच्या ड्रायव्हरनं घडलेला प्रसंग सांगितला. त्याचबरोबर केवटे यांनी माझं ऐकलं असतं तर आज हे सगळं घडलं नसतं अशी खंतही व्यक्त केली.

केवटे यांचा चालक नवनाथ धाकपाडे म्हणाले, जीप चालकानं आमच्या कारच्या समोर जीप आडवी लावली. त्यावेळी परिस्थितीचा अंदाज मला आला होता. मी केवटे यांना म्हणालो, आपण गाडी मागे घेऊन निघून जाऊ, कशाला उगीचच वाद घालायचा. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. समोरच्या जीपमधून ती माणसं खाली उतरली. त्यावेळी केवटे आणि सोनाली भोसले दोघेही खाली उतरले आणि त्यांच्यात आधी बाचाबाची झाली. काही कळायच्या आतच समोरच्याने हत्यार काढले आणि केवटे यांना भोसकले. त्याच व्यक्तीने भोसले यांच्यावर वार केले, कार रिव्हर्स घेण्याची माझी इच्छा होती, केवटे यांनी ऐकले असते तर हा प्रकार टाळता आला असता.

पोलीस ॲक्शन मोडवर

अनमोल केवटे यांच्या अमानुष हत्येनंतर पोलीस ॲक्शन मोडवर येऊन काम करताना दिसत आहेत. मात्र हा सगळा प्रकार केवळ कट मारण्यावरून झाला की यामागे आणखी काही आहे, याचा तपासही केला जात आहे. कारण केवटे हे माहिती अधिकार कार्यकर्ता असण्याबरोबर त्याच्यावर खंडणी, वसुली, हाणामारी करणे, दारू पिऊन गोंधळ घालणे, या प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला दोन वर्षांसाठी सोलापूर मधून तडीपार देखील केलं होतं. मात्र तरीही तो बिनधास्तपणे सोलापुरात फिरायचा. त्याने शिक्षण संस्था, शासकीय कर्मचारी आणि पोलिसांविरोधात माहिती अधिकाराच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या हत्ये मागे केवळ रस्त्यावर झालेले वाद आहेत की पूर्वीचा काही इतिहास आहे याचा शोध घेतला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!