ब्युटी पार्लरच्या कोर्सच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला पुण्यात आणून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या मुलासह तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय साईनाथ राऊत, सुरेश साहेबराव राऊत (रा.जरुळ) व त्यांची मैत्रिण (रा.वैजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून आघुर येथील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. पाच महिन्यांपूर्वी तिची गावातीलच विजय राऊत या तरुणासोबत ओळख झाली आणि पुढे मैत्री देखील झाली. कालांतराने विजय व पीडित मुलगी फोनवर बोलू लागले. बद्दल मुलीच्या आई वडिलांना समजताच त्यांनी मुलीला समज दिली. यामुळे मुलीने विजयसोबत बोलणे सोडले. परंतु तरीही अनेकदा विजय तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यानंतर मुलीच्या आई-वडील व नातेवाईकांनी ही विजयला समज दिली. परंतु त्याच्या वागण्यात बदल झाला नाही.
विजने अनेक वेळा मुलीच्या वडिलांच्या दुकानात समोर जाऊन ‘तू माझ्याबरोबर पळून चल नाहीतर तुझ्या मुलाबरोबर लग्न करशील त्याला मी मारून टाकेल’, अशी धमकी दिली. तरीदेखील ही मुलगी त्याच्याशी बोलायला तयार नव्हती. दरम्यान मागील चार महिन्यांपासून मुलीने शहरातील एका ठिकाणी ब्युटी पार्लरचा कोर्स सुरू केला. तेव्हापासून ती पुन्हा विजयच्या संपर्कात आली. पीडित मुलीकडे मोबाईल नसल्याने ती मैत्रिणीच्या मोबाईल वरून त्याच्याशी बोलू लागली. या दोघांच्या प्रेम संबंधांबाबत तिच्या मैत्रिणीला माहीत होते. काही काळाने पीडित मुलीला निवांत भेटण्यासाठी विजय व त्याच्या मैत्रिणीने एक प्लॅन केला. त्यानुसार मुलीने घरी ‘पुण्याला एक दिवसांचा ब्युटी पार्लरचा कोर्स आहे’, असे सांगितले. ठरल्याप्रमाणे 3 जुलै रोजी रात्री विजय, पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण हे तिघेही पुण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काही वेळात परत येते असे सांगून मैत्री निघून गेली. तर विजयने पीडित मुलीला जवळच असलेल्या लॉजवर नेले. तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर त्याने मुलीला एक मोबाईल घेऊन दिला व ते घरी परतले.
यानंतर पुन्हा मुलगी विजयशी फोनवरून संपर्क करू लागली. हे तिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांनी तिचा फोन काढून घेतला व तिला तिच्या मामाच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर विजय आणि त्याच्या काकाने मुलीच्या मामांना फोन करून मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीला पळवून घेऊन जाऊ असे देखील सांगितले. दरम्यान हे सगळे प्रकरण पोलिसात गेल्या असून मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.