पुणे : हिंजवडी परिसरातील माण-महाळुंगे रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात हिंजवडी पोलिसांना यश आलं. संबंधित व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून देण्यात आला होता.
खून करून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून देण्यात आलेली व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून बालाजी असं तिचं नाव आहे. दारूचा ग्लास सांडल्यानं झालेल्या किरकोळ भांडणात आरोपी निलेश सतीश धुमाळ यानं बालाजीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.
बालाजी आणि निलेश सतीश धुमाळ हे एका बारच्या पाठीमागं बसून दारू पीत होते, त्यादरम्यान बालाजीकडून निलेश धुमाळ याचा दारूचा ग्लास खाली सांडला गेला, याचाच राग मनात धरून निलेश धुमाळ यानं बालाजीचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश धुमाळ यानं टेम्पोचालक राजेंद्र थोरात याच्या मदतीनं माण-महाळुंगे रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बालाजीचा मृतदेह टाकून दिला. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून हा सर्व प्रकार उघडकीस आणला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी निलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात या दोन आरोपींना अटक केलीये.