“प्रेम, मैत्री आणि सोबतीचं सुंदर गाठोडं – ‘अशी ही जमवाजमवी’ उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला”
प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारा चित्रपट ‘अशी ही जमवाजमवी’ १० एप्रिलपासून सिनेमागृहात झळकणार आहे. जीवनाच्या संध्याकाळी उमलणाऱ्या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्री, प्रेम आणि साथ देणाऱ्या नात्यांची नवी परिभाषा पाहायला मिळणार आहे.
पुण्यातील सराफ व्यावसायिक अडकला हनीट्रॅपमध्ये; महिलेने उकळले तब्बल “इतके” लाख रुपये
व्ही. शांताराम यांचे नातू राहुल शांताराम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, अनुभवसंपन्न दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, वंदना गुप्ते आणि सुनील बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्या सशक्त अभिनयामुळे ही कथा अधिक भावस्पर्शी झाली आहे.
चित्रपटाच्या कथानकात उतारवयातील माणसांचे भावविश्व, त्यांच्या गरजा, संवाद, आणि त्यांना मिळणाऱ्या अथवा न मिळणाऱ्या साथीतून निर्माण होणारी गुंतागुंत मांडण्यात आली आहे. “या वयात जोडीदार नसेल तरी मनाचे बोल ऐकणारा एक मित्र हवा असतो. प्रेमाला वयाचं बंधन नसतं,” असं दिग्दर्शक लोकेश गुप्ते म्हणतात.
अशोक सराफ त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगतात, “ही भूमिका माझ्या वयाला साजेशी आहे. प्रेम इथे टिपिकल नसून, प्रॅक्टिकल आहे.” तर वंदना गुप्ते म्हणतात, “आजच्या काळात चॅटिंगपेक्षा समोरासमोर संवाद अधिक महत्त्वाचा आहे. उतारवयात मैत्री आणि सोबतीची भावना अधिक गहिरी असते.”
सुनील बर्वे यांनी त्यांच्या शिस्तप्रिय आणि थोड्याशा चिडखोर व्यक्तिरेखेचं वर्णन करताना सांगितलं, “खऱ्या माणसांच्या गोष्टी सांगणारा हा अनुभव मनाला भिडणारा आहे.”
या चित्रपटातून सामाजिक दृष्टिकोनातून एक महत्वाचा संदेश दिला जातो – की प्रत्येक टप्प्यावर माणसाला प्रेम, संवाद आणि साथ यांची गरज असते. ‘अशी ही जमवाजमावी’ ही फक्त प्रेमकथा नसून, ती आयुष्याच्या एका टप्प्यावर उलगडणारी भावनांची गोफ आहे.
संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहता येईल, असा हा हृदयस्पर्शी चित्रपट उद्यापासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
गुन्हा रद्द होण्यासाठी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव
