राज्यातील राष्ट्रीय ज्यूदोपटूंच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य करू- पुनीत बालन

1003 0

 

राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये पदकप्राप्त खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशप्राप्तीसाठी लागणारे उच्च प्रशिक्षण आणि तदर्थ सुविधा मिळवून देवून त्यांच्या सर्वार्थ प्रगतीसाठी आम्ही खेळाडूंच्या पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन प्रसिद्ध उ‌द्योजक पुनीत बालन यांनी केले.

दिल्ली येथे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रीय सिनीयर्स गटातील स्पर्धेमध्ये महाराष्ट्रच्या श्रद्धा चोपडे हिने कालच प्राप्त केलेल्या सुवर्ण पदकाचा उल्लेख करत बालन म्हणाले की, राज्यातील नैपुण्यप्राप्त ज्यूदोपटू केवळ आधुनिक सुविधा आणि उच्च प्रशिक्षणाच्या अभावाने मागे पडू नयेत ही आमची इच्छा आहे. खेळाडूंच्या समर्थनार्थ पुढे येणारे आमच्यासारखे प्रायोजक लक्षात घेता पालकानीही मोबाईलच्या जाळ्यापासून पाल्यांना दूर करत क्रीडांगणावर पाठवावे. राज्य ज्यूदो संघटनेचे कौतुक करताना बालन म्हणाले की, ज्यूदो या स्वसंरक्षण शिकवणाऱ्या खेळाच्या संपूर्ण प्रसारासाठी केले जाणारे कार्य प्रशंसनीय असून या‌द्वारे राज्यातील युवायुवतीना खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीसह नोकरीतील 5 टक्के आरक्षणाचे महत्व जनमानसात पटवून देण्याचे अथक परिश्रम राज्य ज्यूदो संघटना करत आहे, त्यामुळे संघटनेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकत आहेत आणि शासनाच्या सेवेत रुजू होत आहेत.

दिनांक 06 ते 08 जानेवारी 2025 दरम्यान बालेवाडी-महाळुंगे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 51 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर्स गटाच्या खुल्या ज्यूदो स्पर्धेच्या उ‌द्घाटन समारंभावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोंसले, महासचिव शैलेश टिळक, कोषाध्यक्ष रवींद्र मेटकर, तांत्रिक सचिव दत्ता आफळे, शेखर साखरे, विश्वास जोशी, मुकुंद डांगे या पदाधिकाऱ्यांसह स्पर्धा निरीक्षक अनिल सकपाळ उपस्थित होते. स्पर्धेचे उ‌द्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश गोयथळे, तर प्रास्ताविक शैलेश टिळक आणि आभार दत्ता आफळे यांनी मानले. राज्य संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोंसले यांनी संघटनेतर्फे प्रमुख पाहुणे आणि खेळाडूंकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. या स्पर्धेतील विजेते पुढे होणाऱ्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेसाठी राज्यातील 26 जिल्ह्यामधून पावणेतीनशे मुले आणि मुली खेळाडूंसह 25 पंच आणि व्यवस्थापक तसेच संघटनेचे पदाधिकारी क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी साई प्रशिक्षक सुशील गायकवाड (अमरावती) हे प्रमुख सामनाधिकारी असून त्यांना तुषार सांगळे (पुणे) आणि मंगेश भोसले (ठाणे) हे सहकार्य करत आहेत तर ठाण्याच्या शैलेश देशपांडे यांची ज्यूरीपदी आणि दर्शना लखाणी यांची स्पर्धेच्या तांत्रिक संचालन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!