नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मोठा राडा झाला. सेमी फायनल मध्ये शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्तीचा सामना झाला. मात्र यामध्ये शिवराजला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संतापलेल्या शिवराजने पंचांशी गैरवर्तन केलं. पंचांना लाथ मारून त्यांची कॉलर ही पकडली. त्यानंतर त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली मात्र आता पुन्हा एकदा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ हा सामना रंगण्याची शक्यता आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या दोन्ही पैलवानांमध्ये आपण कुस्ती आयोजित करणार असल्याची घोषणा केली. तर त्यांच्या या घोषणेनुसार आता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ हा शिवराज राक्षेसह कुस्ती खेळण्यास तयार झाला आहे. पुण्यात त्याने या संदर्भात वक्तव्य केले आहे.
हरेल किंवा जिंकेल पण खेळेल
पृथ्वीराज मोहोळ म्हणाला, ‘अशी स्पर्धा झाली तर नक्कीच मी खेळेल. वाद करण्यासारखी ती कुस्ती नव्हती. पुन्हा मैदान घेतलं तर मी नक्कीच खेळणार. मी सगळ्यात लहान आहे, मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांनी माझी सुद्धा प्रॅक्टिस घेतली आहे. त्यामुळे सगळ्यांचं मी ऐकतो. त्यामुळे मी कुस्ती खेळेल. काहीही होईल हरेल किंवा जिंकेल पण त्यापेक्षा मी एक खेळाडू आहे, हे महत्त्वाचं आहे. खेळाडूचे काम हे खेळण्याचे असते. त्यामुळे मी खेळायला तयार आहे.’
पृथ्वीराज मोहोळ याने पुन्हा शिवराज राक्षेसह कुस्ती खेळण्याची तयारी दाखवली आहे. मात्र आता यासाठी शिवराज तयार होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.