वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे (PI Vishnu Tamhane) व व सीए विजय अनपट (CA Vijay Anpat) यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे आयोजित आयर्न मॅन स्पर्धेत यश मिळवले. ठाणे आयुक्तालय मधील पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांचे व ठाणे आयुक्तालय यांचे या जागतिक पातळीवरील कामगिरीबद्दल पोलीस दल व नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, बस्लटन येथे 1 डिसेंबर रोजी आयर्न मॅन ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 3.8 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग, आणि 42.2 किमी धावणे हे सलग 17 तासामध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. ते करत असताना स्पर्धकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो. या स्पर्धेत जगभरातून 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 1100 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामध्ये पुण्यातील जवळपास 14 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुण्यामध्ये पूर्वी कार्यरत असलेले व सध्या ठाणे येथील उल्हासनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे (वय 56 वर्ष ) यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर त्यांचा मुलगा गौरंग ताम्हणे (वय 18 वर्ष) आणि सीए विजय अनपट यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता. विष्णू ताम्हणे व विजय अनपट यांना सदर स्पर्धेत स्विमिंग कामी संजीवन वालावलकर, रनिंग व सायकलिंग साठी चैतन्य वेल्हाळ, स्ट्रेंथ ट्रेनिंग साठी विजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केलेले आहे.
“एवरीथिंग इज पॉसिबल”
‘ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे माझी वैयक्तिक कामगिरी नसून माझे सहकारी, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, माझे कोचेस, कुटुंब अशा सर्वांची मिळून सांघिक कामगिरी आहे. त्याचप्रमाणे ही पोलीस दलासाठी गौरवशाली बाब आहे’, अशा प्रकारे भावना विष्णू ताम्हणे यांनी व्यक्त केल्या. या स्पर्धेचे ध्येय वाक्य ” एवरीथिंग इज पॉसिबल” हे आहे. यामधूनच प्रेरणा घेऊन विष्णू ताम्हणे यांनी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांचे सहकारी विजय अनपट यांच्या मदतीने ही स्पर्धा पार पाडून सगळ्यांनाच प्रेरणा दिली आहे. त्यानी आपल्या कर्तृत्वाने शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी पोलीस दलातील बांधवांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. धैर्य, संयम, नियोजन आणि शिस्त यांतून आपले इच्छित ध्येय गाठणे शक्य होते, हे त्यांनी आयर्न मॅन स्पर्धा जिंकून सिद्ध केले आहे.