कोलंबो : आशिया कप 2023 च्या सुपर 4 स्टेजमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अर्धशतक ठोकून वनडे क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे.
श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर 4 चा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी ओपनिंग केली. सुरुवातील दोघांनी थोडी सावध खेळी केली. यानंतर थोडा जम बसताच या दोघांनी चौफेर फटकेबाजी केली.
आशिया कप 2023 च्या ग्रुप स्टेज सामन्यात स्वस्तात बाद झालेलया या सलामी जोडीने सुपर 4 सामन्यात मात्र मैदानावर चौफेर फटकेबाजी करून गोलंदाजांना घाम फोडला. स्टार फलंदाज शुभमन गिलने 52 बॉलमध्ये 58 धावा केल्या त्याच्या जोडीला रोहित शर्माने देखील 49 बॉलमध्ये 56 धावा केल्या. याबरोबर रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमधील त्याची 50 अर्धशतक पूर्ण केली आहेत.