सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोबर हॉल आणि अद्ययावत सिंथेटीक ट्रॅकच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, बालेवाडी परिसरात उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातल्या कुठल्याही भागात समाजाच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्माकरकासाठी देखील सहकार्य करण्यात येईल.
कार्यक्रमापूर्वी अजित पवार आणि उदय सामंत यांनी स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनी यावेळी सिंथेटिक पथ, व्यायामशाळा आणि शुटींग रेंजची पाहणी करुन माहिती घेतली. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळ दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले.
अशा आहेत विद्यापीठातील नव्या क्रीडा सुविधा
क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय क्रीडा प्रकारांसाठी इनडोअर सभागृह तयार करण्यात आला आहे. यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत.
क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक व पॅव्हेलियन इमारत तयार करण्यात आली आहे. त्याच्या मध्यभागी फुटबॉल क्रीडांगण तयार करण्यात आले असून यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत रुपये ४ कोटीचे अनुदान प्राप्त झाले व उर्वरित खर्च विद्यापीठाने केला आहे. या अद्ययावत सिंथेटिक पथचा खेळाडूंना लाभ होणार आहे.