तुमच्यासाठी खास

पंढरीच्या वारीला वारकरी महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून का जातात ? जाणून घ्या

आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर माहेरघर आहे. वारकरी विठ्ठल-रखुमाईला जेवढं महत्त्व देतात तेवढंच मानाचं स्थान ते तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावनालाही देतात. वारीत लाखो भाविकांच्या मस्तकावर तुळस विराजमान झालेली दिसते.

आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या वारीला जाताना प्रत्येक वारकरी स्त्रीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन दिसतेच.वारीमध्ये अनेक वारकरी महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून पंढरपूरला जातात.तुळस ही कृष्णसखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच आहे.साहजिकच सगळ्या वैष्णव संतांना आणि वैष्णवभक्तांनाही तिचे कमालीचे प्रेम आहे. पांडुरंग हृदयात हवा, तशी प्रत्येकाच्या घरात तुळसही हवीच या भावार्थाने वारकरी महिला विठ्ठलाच्या भेटीला तुळशी वृंदावन घेवून जात असतात. खरंतर आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीचे महत्व फार आहे. तिला पवित्र मानले जाते.तुळस ही सासुरवाशिणीची प्रिय सखी असते. सासरी होणारा जाच, छळ ती तुळशीजवळ बोलून व्यक्त करते. माहेरची आठवण, आईचे प्रेम तुळशीला सांगुन ती तिथेच रमते. तिच्या सहवासात दुःखाचा कढ सोसते व मन हलके करते. तसेच तुळशीच्या दर्शनानं सुख-समृद्धी प्राप्त होते.ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध असते. तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते.

तुळसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर।
तेथ वसती यम। किंकर आ आहे म्हणोनि ll
तुलसीवृदांवन ज्याचे घरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी ll

याचा अर्थ ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावं ज्यांच्या घरात तुळस आहे त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात. जो व्यक्ती तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरीचं स्मरण करतो तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.