नवाब मलिक, अबू आझमींविरोधात लढणारे एन्काऊंटर स्पेशलिस्ट बुलेट पाटील आहेत तरी कोण ?

582 0

राज्यातील बहुतांश मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. मात्र काही ठिकाणी युती आणि आघाडी पुढे स्वतंत्र पक्षांचं आव्हान आहे. मानखुर्द शिवाजीनगर मध्ये देखील असाच प्रकार घडणार आहे. कारण समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचं कडवं आव्हान महायुती पुढे आहे. आणि त्यांच्याच विरोधात शिंदे गटाने एन्काऊंटर्स स्पेशलिस्ट बुलेट पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आपल्या अजब नावामुळे चर्चेत असलेले हे बुलेट पाटील आहेत तरी कोण पाहूया…

बुलेट पाटील यांचं खरं नाव सुरेश पाटील असं आहे. ते माजी पोलीस अधिकारी आहेत. क्राईम ब्रॅंचमध्ये काम करताना त्यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांचं नाव बुलेट पाटील असं पडलं. आणि हीच त्यांची नवी ओळख बनली. पुढे बुलेट पाटील यांनी पोलीस खात्याची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत काम करत असून ते याच भागात नगरसेवक होते. याआधी बुलेट पाटील यांना विधानसभेत पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत.

या मतदारसंघातून गेले तीन टर्म आमदार असलेले अबू आझमी यांना पराभूत करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. मात्र आझमी विरुद्ध पाटील हा सामना पहिल्यांदाच रंगणार नसून या आधी देखील अशीच निवडणूक झाली होती.

अबू आझमी यांचा हक्काचा वोटर मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात आहे. ते गेले तीन टर्म याच मतदारसंघातून आमदार आहेत. 2014 मध्ये देखील अबू आझमी विरुद्ध बुलेट पाटील अशी लढत झाली होती. त्यावेळी या लढतीत आझमी यांना 41 हजार, बुलेट पाटलांना 31 हजार तर काँग्रेस उमेदवाराला 27 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे कडवे शिवसैनिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलेट पाटील यांना यंदाही अबू आझमीं विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.

मात्र दुसरीकडे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे या मतदारसंघातून लढण्यासाठी सातत्याने इच्छुक होते. त्यामुळे अजित पवार गटाच्या एबी फॉर्मवर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज भरला आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने आपण मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र दोन मुस्लिम उमेदवार असल्यामुळे मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा शिंदे गटाच्या बुलेट पाटील यांना होऊ शकतो.

या मतदार संघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असं वाटत असलं तरीही अबू आझमी यांची मतं फिरवण्यासाठी जाणून-बुजून महायुतीने नवाब मलिक यांना मैदानात उतरवलं असून याचा थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होईल, त्यामुळेच महायुतीने हा डाव खेळला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या ठिकाणी नवाब मलिक यांनी बंडखोरी केली आहे की त्यांना जाणून बुजून महायुतीने उभं केलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आझमी आणि मलिक या दोन मुस्लिम उमेदवारांमुळे बुलेट पाटील यांना फायदा होऊ शकतो हे मात्र नक्की.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!