गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली. आपचे राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते पत्रकार बनलेले इसुदान गढवी कोण आहेत ? पाहूयात, आजच्या TOP NEWS INFO मध्ये…
गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील जामखंभाळीया तालुक्याजवळच्या पिपलिया गावातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात 10 जानेवारी 1982 रोजी इसुदान गढवी यांचा जन्म झाला. जामनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गुजरात विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. पत्रकार बनल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये ई टीव्हीसाठी वार्तांकन केलं. नंतर अहमदाबादमध्ये न्यूज-18 चॅनेलचे ब्युरो चीफ बनले. 2016 मध्ये व्ही टीव्हीसारख्या आघाडीच्या चॅनेलमध्ये संपादक म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. ‘महामंथन’ या डिबेट शोसाठी त्यांना ओळखलं जातं. या कार्यक्रमात लोकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून गढवी यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली.
महामंथनमध्ये ते प्रामुख्यानं शेतकरी, मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांवर बोलत असल्यानं त्यांची लोकप्रियता वाढली. पीक विम्याच्या मुद्द्यावरून गुजरातमध्ये गदारोळ माजल्यानंतर या मुद्द्यावर त्यांनी सर्व शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लोकप्रिय न्यूज अँकर म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर 14 जून 2021 रोजी त्यांनी आप पक्षात प्रवेश केला. गुजरातमध्ये आपच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जनतेनं सुचवलेला असेल, असं पक्षानं आधीच जाहीर केलं होतं. यासाठी लोकांकडून पसंतीही मागवून घेण्यात आली होती. त्यानुसार, इसुदान गढवी यांचं नाव आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं.
इसुदान गढवी हे सध्या आपचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव म्हणून कार्यरत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं आहे.
1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात ही निवडणूक होणार असून 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 2017 मध्ये कॉंग्रेसनं भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. यावेळी मात्र आपनं देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली असल्यानं गुजरातमध्ये भाजप-काँग्रेस-आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.