… म्हणून गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोरयाच म्हटलं जातं

229 0

14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणजे गणपती ! गणपती बाप्पा समस्त भक्तजनांचा लाडका आहे. गणपती हे तर आराध्य दैवत ! कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. अगदी लांबच्या पल्ल्यावर प्रवासासाठी रवाना होताना देखील आपल्या तोंडून ‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयघोष होतो पण ‘गणपती बाप्पा’ असं म्हटल्यावर त्यापुढं ‘मोरया’ हाच शब्द का येतो ? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का ?

गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटलं जातं याविषयी कदाचित फार कमी लोकांना माहीत असावं. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागं तब्बल 600 वर्षे जुनी एक कथा आहे. पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड या भागातील ही कथा आहे. या गावात जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे एक निस्सीम भक्त होते. मोरया गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर 95 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढं ते याच ठिकाणी स्थायिक झाले. सतत 42 दिवस तप करून त्यांनी गणपती बाप्पाला प्रसन्न केले होतं. असं सांगितलं जातं की, वयाच्या तब्बल 117 व्या वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु, पुढं वृद्धपणामुळं त्यांना मंदिरात जाणं शक्य होत नव्हतं.

आपल्याला देवदर्शन होत नाही या विचारामुळं मोरया गोसावी दुःखी राहू लागले. अशावेळी बाप्पाला तरी आपल्या भक्ताचं दुःख कसं बरं पाहवेल ? एकेदिवशी गणपती बाप्पानं त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन, असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. स्नानानंतर पूजा करताना त्यांना त्यांच्या ओंजळीत श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती आढळून आली. पुढं हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ही समाधी देखील या मंदिराजवळच आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावानं ओळखले जातं. बाप्पाचे निस्सीम भक्त म्हणून मोरया गोसावी यांचं नाव गणेशाशी अशाप्रकारे जोडलं गेलं की लोक नुसतं ‘गणपती बाप्पा’ असं न बोलता ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि मग पुढं संपूर्ण देशात एकच जयघोष सुरू झाला… गणपती बाप्पा मोरया !

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!