महिलांनी सुरू केलेल्या स्टार्टअप्सना सुरूवातीपासून प्रोत्साहित करण्याकरीता राज्यात सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करुन त्यांना स्टार्टअप सुरू करण्यास अर्थसहाय्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ राबविण्यात येत आहे. महिला नेतृत्वाला पाठवा देणे आणि नवीन रोजगार निर्मितीला चालना देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होईल, या अनुषंगाने योजना राबवण्यात येणार आहे.
योजनेचे स्वरूप
योजनेतील एकूण तरतूदीच्या २५ टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल. राज्यातील महिला नेतृत्वातील सुरुवातीच्या टप्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान १ लाख ते कमाल २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.
योजनेच्या लाभासाठी स्टार्टअप भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचा मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील असावा. स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक किंवा सह संस्थापक यांचा किमान ५१ टक्के वाटा असावा. महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा. महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल १० लाख ते १० कोटी रुपयापर्यंत असावी. महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
अर्ज कसा कराल ?
ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषीत करण्यात आले असून सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे मान्यता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यकता आहे. प्राप्त अर्जापैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येईल. प्राप्त अर्जापैकी जास्त रोजगार निर्मिती करण्याऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रियेकरीता आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय हे मुल्यांकन समिती गठीत करतील व या समितीमार्फत प्राप्त अर्जामधील निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्सचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निकषांद्वारे स्टार्टअप्सची निवड करण्यात येईल. याकरीता स्टार्टअप क्षेत्रातील किंवा बँकींग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येईल. पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्स यांना देय ठरणारी रक्कम अनुदान स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व स्वावलंबी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.