आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. शिवसेनेत प्रवेश करतात अंधारे यांची शिवसेनेच्या उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.
कोण आहेत सुषमा अंधारे
सुषमा अंधारे या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र, २००६ मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. २००९ ते २०१० या काळात मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय ‘भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण’ असा आहे परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या. सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशील आहेत. भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.
अंधारे यांनी २००९ परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्या पराभूत झाल्या होत्या.