पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह (Pune News) क्रमांक 8 मधील मुलांच्या मेसच्या जेवणात अळी निघाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. यामुळे विद्यार्थ्यंकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संबंधित मेसचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मागणी संतप्त विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी निघाल्याची घटना घडली होती. त्यामुळे रिफ्लेक्ट्री चालकाचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अळी निघाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
वसतीगृह क्रमांक 8 व 9 या दोन्ही ठिकाणी एकाच कंत्राटदाराकडून मुलांना जेवण दिले जाते. गुरुवारी सायंकाळी वसतिगृह क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी निघाली. वसतिगृह आठ मध्ये तयार केलेले जेवण वसतिगृह क्रमांक 9 मधील विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी सापडली.
याबाबत मेसेज चालकाला विचारले असता, तांदळाचा नवीन कट्टा खराब निघाला. पुन्हा असे होणार नाही, मी तांदूळ बदलून टाकतो, असे मेस चालवणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.