काही दिवसांपूर्वी पर्यंत पुण्यात अग्रवाल कुटुंबीयांची चर्चा होती. बिल्डर विशाल अग्रवाल च्या अल्पवयीन मुलाने गाडी चालवत दोन निष्पाप लोकांचा बळी घेतला. त्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांची एक एक प्रकरण बाहेर आली. तसाच काहीसा प्रकार आता पूजा खेडकर प्रकरणात घडत आहे. खाजगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट आणि लाल दिवा लावून फिरल्याने पूजा खेडकर चर्चेत आल्या. त्यानंतर आता खेडकर कुटुंबीयांचीही वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकांना धमकावल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचे आई-वडील नेमके कोण आहेत, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
खेडकर कुटुंबाचे पार्श्वभूमी काय ?
पूजा खेडकर यांचे वडील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी आहेत. दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त होते. त्याचबरोबर ते भाजपमध्ये देखील सक्रिय होते. त्यांचे बंधू माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे दक्षिण नगरचे तालुकाध्यक्ष होते. दिलीप खेडकर आणि त्यांच्या बंधूंनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी मोहटादेवीला साकडे घातले होते. पंकजा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तेव्हा त्या आनंदात त्यांनी देवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण केला होता.
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या डॉक्टर असून भालगाव नावाच्या गावाच्या माजी लोकनियुक्त सरपंच आहेत. याच भालगावमधून लोकसभा निवडणुकी वेळी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना काही गावकऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या सुजय विखे यांनी पूजा खेडकर यांचे काका माणिक खेडकर यांचे तालुकाध्यपद काढून घेतले, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यामुळेच विखे आणि खेडकर यांच्या काहीच अलबेल नसल्यामुळे दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. अर्थाचे निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांप्रमाणेच त्यांचे आजोबा देखील उच्च पदस्थ व्यक्ती होते. त्यांचे आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी होते. त्याचबरोबर खेडकर कुटुंबीयांकडे 40 कोटींपेक्षा अधिक संपत्ती असल्याची माहिती, दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना जाहीर केली होती.