पुणे शहरात गुरुवारी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 23 जानेवारी रोजी पुण्यातील कात्रज, स्वारगेट, महर्षी नगर यासह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यातील तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्व्हचे व मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. पुणे महानगरपालिकेद्वारे शहरात जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणी जपून वापरावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
